खरीप हंगामानंतर बळीराजा आता रब्बीच्या हंगामाची तयारी करत आहे. रब्बी हंगामासाठी प्रशासन तयार असून राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठी या काळात बियाण्यांचा पिठारा उघडला आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत बियाणे अनुदानावर वितरित केली जाणार आहेत. या रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी ६२ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना सांगितले.
राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ५८६ क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित गहू १८३० हेक्टर, हरभरा २६,८२१ हेक्टर, मका (संकरित) २९३ हेक्टर, रब्बी ज्वारी २,४६० हेक्टर, करडई १५१० हेक्टर, जवस १०५० हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा २५०० हेक्टर असे एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे.
रब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारित-संकरित वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येते. १० वर्षांच्या आतील वाणांच्या बियाणांसाठी गहू दोन हजार रुपये क्विंटल, हरभरा २५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी ३००० रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.
Published on: 03 November 2020, 11:31 IST