शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना राबविली जाते. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताच्या असलेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या बाजार समित्या या योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन संचालकांना दिले.
सन 2018 च्या खरीप हंगामातील मूग, उडीद पिकांची आवक बाजारात नुकतीच सुरु होत आहे. या पिकांचा बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे याबाबत खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
संबंधित बातमी वाचण्यासाठी: शेतमालास चांगला दर मिळावा यासाठी शासन कटीबद्ध
सन 2017-18 या वर्षात राज्यातील १३८ बाजार समित्यांनी या योजनेची अंमलबजावणी केली असून सुमारे 2.15 लाख क्विंटल शेतमालाची साठवणूक करुन शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल साठविण्यासाठी संबंधित बाजार समितीशी त्वरित संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने त्यांचा शेतमाल विक्री करु नये. ज्या बाजार समित्या शेतमाल तारण कर्ज देत नाहीत अशा बाजार समित्यांची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा उप निबंधकांकडे करावी, असे आवाहनही पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
Published on: 18 September 2018, 06:35 IST