वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना भुवनेश्वर येथील ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात "कापूस पिकाच्या समस्या व उपाययोजना'' यावर दिनांक 22 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय परिसंवादात कापूस पिकातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल प्राफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
परिसंवादात ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. अग्रवाल व उद्यपुर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. एन. एस. राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरिल परिसंवादाचे आयोजन कापूस संशोधन व विकास संघटना, हिस्सार आणि भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे करण्यात आले होते.
विद्यापीठाचे कपाशीचे देशी वाण, अमेरिकन सरळ व संकरित वाण विकसीत करण्यात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापूस पैदासकार आणि कापूस विशेषज्ञ म्हणून मोलाचे योगदान आहे. यात एनएचएच 206, एनएचएच 250 व एनएचएच 715 हे अमेरिकन संकरित कपाशीचे वाण व एनएच 615 व एनएच 635 हे अमेरिकन कपाशीचे सरळ वाण मध्य भारतासाठी लागवडीकरिता प्रसारीत करण्यात आले. पीएचए 46, पीए 183, पीए 08, पीए 528 व पीए 740 हे देशी कापूस वाण प्रसारित करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
बी टी कापूस उत्पादन तंत्रज्ञान, एकात्मीक कीड व रोगांच्या व्यवस्थापनावर संयुक्त संशोधन समिती मार्फत विविध शिफारशी करण्यात मोलाचा सहभाग आहे. या शिफारशी पीक प्रात्यक्षीके, शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, कृषि दिंडी इत्यादी माध्यमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांनी आचार्य व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले असुन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालीकात मध्ये संशोधनपर व इतर माध्यमातुन मराठी लेखांचे लिखान केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग नोंदवून संशोधन लेखांचे सादरीकरण केले.
Published on: 04 February 2020, 08:29 IST