शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटत सापडला आहे. डाळिंबावर पिन बोरर, होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंबाच्या बागा संकटात सापडल्या आहेत.
डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक मागील पाच वर्षापासून तेलकट डाग व अतिवॄष्टीमुळे अडचणीत असताना त्यात भर म्हणून झाडाला पिन बोरर व होल बोरर या किडीमुळे झाडाची मर मोठया प्रमाणावर वाढली आहे. या समस्येमुळे बागाच्या बागा संपत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकाच्या वतीने खासदार डॉ. विकास महात्मे आणि मोर्फाचे अध्यक्ष कॄषीभूषण अंकुश पडवळे यांनी कृषीमंत्री तोमर यांची भेट घेतली. डाळिंब बागा वाचविण्यासाठी केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक व नुकसान भरपाईसाठी मदत करावी अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री नरेद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील चाळीस हजार हेक्टर जास्त क्षेत्र पिन व होल बोररमुळे आलेल्या मरीने संपले असून, ऐंशी हजार हेक्टरवरील क्षेत्राला या किडीची लागण झाली आहे. केंद्रीय कॄषीमंत्री नरेद्रसिंग तोमर यांनी डाळिंबवरील संकटाची तत्काळ दखल घेऊन कॄषीसचीव संजय अग्रवाल यांना केंद्रीय पथक पाठविण्याच्या सुचना दिल्या.
Published on: 07 February 2022, 10:21 IST