मुंबई: महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त त्यांचे विचारमूल्य समाजापर्यंत पोहचावीत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले. खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. खादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन ‘महाखादी ब्रॅण्ड’ विकसित करावा. खादीच्या ब्रॅण्डींग केलेल्या वस्तुंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती विशाल चोरडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलिमा केरकेट्टा उपस्थित होते.
देशाचे अर्थकारण सक्षम करायचे असेल तर खादी उद्योगाला ‘महाखादी’ ब्रॅण्डच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या विचारांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या पुस्तक व श्राव्य सीडीचे आणि महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंकाचे प्रकाशन, महाखादीचे थीम साँगचे लाँचींग, फ्रेंड ऑफ हनी बी ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी प्रकाशित केलेले ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ हे पुस्तक महात्मा गांधी यांचे विचार, महाराष्ट्राशी असलेले नाते, स्वच्छतेचा संदेश यासह महाराष्ट्रातील विविध स्मृती विशद करणारी माहिती या पुस्तकातून वाचकांना उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हे प्रदर्शन 6 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
Published on: 05 October 2018, 12:43 IST