1. बातम्या

डॉएच्च बँक आणि स्वदेश फाऊंडेशनने केला फळझाडांची लागवड करण्याचा संकल्प

मुंबई : डॉएच्च बँक आणि स्वदेश फाऊंडेशनने रायगड जिल्ह्यात तब्बल ४० हजार फळझाडांच्या लागवडीचा नवीन संकल्प केला आहे.  या फळझाडांच्या माध्यमातून चार हजार व्यक्तींना नियमित आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण केले जाणार आहे. भारतात मुंबईत पहिली शाखा उघडण्याच्या घटनेस चाऴीस वर्ष पुर्ण होणे तसेच रायगड जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वदेश फाऊंडेशनच्या सहकार्याने सामाजिक विकास उपक्रमांना (सीएसआर) चार वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने हा फळझाड लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.  चाळीस हजार झाडांना येत्या तीन-चार वर्षात फळधारणा सुरु होऊन लाभधारक कुटुंबाना वार्षिक सहा कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

सुक्ष्म पातळीवर लघुशेतीला पाठबळ दिल्यास ग्रामीण भागातील गरिबीच्या उच्चाटनास हातभार लागण्यास मोलाचा हातभार लागणार आहे. परंतु त्याचबरोबर त्यांचे मुख्य भांडवल असलेल्या जमिनी आणि श्रमाचा थेट आर्थिक मोबदला मिळण्याचा थेट मार्गही उपलब्ध होणार असल्याचा दावा डॉएच्च बँकेचे भारतातील मुख्य अधिकारी कौशिक शापारिया यांनी याप्रसंगी केला.  स्वदेश फाऊंडेशनबरोबरील भागीदारीमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनमानात खऱ्या अर्थाने सुधारणा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

भारतातील ग्रामीण विकासासाठी डॉएच्च बँकेचे सुरु असलेले अथक प्रयत्न हे दखलपात्र असून अतिशय खालच्या स्तरापासून बदल आणि सक्षमीकरण घडवून आणण्याच्या संयुक्त दृष्टीकोनाशी आम्ही भागीदार आहोत, याचा आम्हाला आनंद होत आहे.  गेल्या चार वर्षात ग्रामीण विकासात डॉएच्च बँक हे आमच्या मोठ्या सहकाऱ्यांपैकी एक सहकारी असून त्यांच्याबरोबर आम्ही अनेक नवनवीन यशाचे टप्पे गाठण्यास उत्सुक असल्याची उस्फूर्त प्रतिक्रिया स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी व्यक्त केली.

 


गेल्या चार वषात डॉएच्च बँकेने स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील 43 हजार 500 आदिवासी व्यक्तींच्या जीवनात बदल घडविला आहे.  एप्रिल 2018 पासून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित अडीच हजार तासांचे योगदान सामाजिक उपक्रमासाठी दिलेले आहे.  समाजासाठी थेट सहभागासारख्या उपक्रमातून डॉएच्च बँकेने स्वदेस फाऊंडेशनच्या साथीने 10 हजार ग्रामीण कुटूंबांच्या जीवनात बदल घडविताना त्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा उभारताना कृषीवर आधारित रोजगारही शेतातच उपलब्ध करुन दिलेला आहे.  पिण्याच्या स्वच्छ पाण्यामुळे रायगड जिल्ह्यातील एक हजार कुटूंबाचे जीवनमान उंचावले आहे.  परंतु त्याचबरोबर पाण्याचा अतिशय तोलुनमापून वापर सुरू झाल्याने अतिरिक्त बाराशे एकर शेतजमीन त्यांना सिंचनाखाली आणत चक्री पध्दतीने पीकही घेता येणेही शक्य झाले आहे.

कोवीड-19 च्या उद्रेकानंतर डॉएच्च बँक आणि स्वदेस फाऊंडेशनने एकत्र येत जिल्ह्यात एप्रिलपासून किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तुंचे अकरा हजार किटसचे वाटप आदिवासी कुटूंबांना केले आहे.  मुंबईत बँकेने स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. आर. एन. कूपर महापालिका रुग्णालय आणि एचबीटी ट्रामा केअर रुग्णालयाला नऊ व्हेंटीलेटर्स आणि 14 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स पुरविले आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters