गेल्या अनेक वर्षापासून बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांशी दोन हात करत काळ्याआईच्या सेवेत व्यस्त आहे. नैसर्गिक संकटांमुळे आधीच मेटाकुटीला आलेला बळीराजा सुलतानी संकटांमुळे पुरता भुईसपाट होण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे चुकीचे किटकनाशक फवारल्याने दहा एकर क्षेत्रावरील हरभरा पिक करपून गेल्याची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याचे लाखापुर येथील रहिवाशी शेतकरी प्रकाश सिंग चव्हाण यांनी दहा एकर क्षेत्रात मोठ्या कष्टाने हरभरा पिकाची लागवड केली होती, अहोरात्र काबाडकष्ट करून त्यांनी हरभरा पीक वाढवले होते. त्यांच्या हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव नजरेस पडत होता, म्हणून त्यांनी किडीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करण्याचा निर्णय घेतला, त्या अनुषंगाने त्यांनी 16 तारखेला कृषी सेवा केंद्रा वरून एका किटकनाशकाची खरेदी केली आणि हरभऱ्यावर त्याची फवारणी केली.
मात्र किडींचा बंदोबस्त होण्याऐवजी या कीटकनाशकांमुळे प्रकाश यांचा दहा एकरांवरील हरभरा संपूर्ण करपून गेला त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार कृषी विभागाला केली असून देखील अद्याप पर्यंत प्रकाश यांना कुठलीच नुकसान भरपाई मिळालेली नाही. प्रकाश यांचे लाखापूर आणि दुर्गवाडा येथे शेतजमीन आहे. दोन्ही ठिकाणच्या एकूण दहा एकर क्षेत्रात त्यांनी हरभरा पीक लागवड केले आहे. हरभरा पिकात किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने त्यांनी कृषी सेवा केंद्रा वरून कीटकनाशकाची खरेदी केली आणि मजुरांमार्फत आपल्या दहा एकर क्षेत्रावर फवारणी केली. फवारणी केल्यानंतर दोन दिवसात प्रकाश आपल्या शेत पिकाची पाहणी करण्यात गेले. तेव्हा त्यांनाआपले हरभरा पिक कीटकनाशक फवारल्यामुळे जळून खाक होत असल्याचे निदर्शनास आले. आपल्या शेतातील सोन्यासारखे पीक डोळ्यापुढे जळून खाक होताना बघून प्रकाश यांची पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लागलीच संबंधित प्रकरणाची कृषी विभाग मुर्तिजापुर् येथे जाऊन तक्रार केली.
त्या अनुषंगाने कृषी विभाग मुर्तिजापुर् यांच्याकडून एका पर्यवेक्षकास त्यांच्या वावरात पाठवण्यात आले. मात्र संबंधित पर्यवेक्षकांने घडलेल्या प्रकरणाची वरवर पाहणी केली असल्याचा आरोप शेतकरी प्रकाश यांनी यावेळी केला. तसेच पाहणी होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही कृषी विभाग व प्रशासनाकडून याबाबत कुठलीच कारवाई केल्याचे चित्र नजरेस पडत नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रशासनाने अथवा संबंधित विभागाने हरभरा पिकाच्या नुकसानीची भरपाई ताबडतोब द्यावी अशी मागणी प्रकाश यांनी यावेळी केली. शिवाय अद्याप पर्यंत प्रशासनाकडून कुठलेच पाऊल उचलले गेली नसल्याची तक्रार देखील केली.
याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाठवलेल्या पर्यवेक्षकास औषधांचे चुकीचे मिश्रण केल्याने पिक जळालं असल्याचे आढळून आले आहे.
तसेच मूर्तिजापूर येथील तहसीलदार यांनी सांगितले की, सदर प्रकरण नैसर्गिक आपत्ती मधले नसून याबाबत कृषी विभाग कारवाई करू शकतो. आम्हाला सदर प्रकरणात कार्यवाही करण्याचा तसेच मदत जारी करण्याचा अधिकार नाही.
Published on: 28 January 2022, 01:44 IST