Farmer Protest 2.0 : विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. यामुळे हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळाले आहे. यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या शेतकऱ्यांवर सोडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दिल्ली आणि हरियाणाची सिंघू सीमा सील करण्यात आली आहे. पंजाबमधील फतेहगढ साहिब येथून मंगळवारी सकाळी १० वाजल्यानंतर शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. यानंतर शेतकरी शंभू सीमेवर पोहोचले आहेत.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत चंदीगडमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीकडे जाणारा मोर्चा थांबवण्यासाठी कोणताही तोडगा निघू शकला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पाच तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे शेतकरी संघटना मंगळवारी दिल्लीत आपले आंदोलन सुरू करणार आहेत.
दरम्यान, शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी निघाले असल्याने पंजाब, हरियाणा सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शंभू बॉर्डर (अंबाला), खानोरी (जिंद) आणि डबवली (सिरसा) येथूनही शेतकरी दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करतील. शेतकरी ज्या ट्रॅक्टरमधून प्रवास करत आहेत. त्या ट्रॅक्टरमध्ये ६ महिन्यांपर्यंत रेशन असते. या मोर्चापूर्वी, KMSC ची कोअर कमिटी आणि मोठे शेतकरी नेते नुकतेच दिल्ली चलो मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि तामिळनाडूला गेले होते.
Published on: 13 February 2024, 02:48 IST