खान्देशातील सगळ्यात महत्त्वाचे पिक हे केळी असून हे बारमाही घेता येणारे पीक आहे. परंतु केळीचे आगार म्हटले जाणाऱ्या खानदेश विशेषतः जळगाव जिल्ह्यात सध्या केळीची आवक घटलेली आहे. आवक घटून देखील केळीच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसत नाहीये
जर खानदेशचा विचार केला तर सध्या 175 ट्रकच्या साह्याने 16 टन सरासरीने केळीची आवक होत आहे. या परिस्थितीत केळीचा प्रतिक्विंटल 400 ते 700 रुपये असा दर मिळत आहे. अगोदरच हवामान बदलाचा परिणाम केळी पिकावर झाल्याने उत्पादन कमी आहे. त्यामुळे या घटलेल्या उत्पादनाची भर ही चांगल्या मिळणाऱ्या दरातून होईल असा अंदाज शेतकर्यांचा होता.परंतु सध्या बाजारपेठेची स्थिती बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे. सध्या केळीची काढणी सुरू आहे परंतु दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
या परिस्थिती मागील प्रमुख कारणे
यावर्षी हवामान बदलाचा परिणाम हा केळी पिकावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.त्यासोबतच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी पडलेल्या पावसाने केळी भागांमध्ये बराच काळ पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील काही शेतकऱ्यांनी नियोजनाने काही उत्पादन पदरी पडले परंतु त्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यासोबतच सध्या थंडीचे प्रमाण जास्त असल्याने केळीला मागणी कमी असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात दर वाढतील असे एक आशादायक चित्र आहे परंतु त्याचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होईल की व्यापाऱ्यांना हे येणारा काळच ठरवेल.
सध्या थंडीमुळे केळीला मागणी कमी राहते परंतु या वर्षी अशी स्थिती असली तरी यंदा उत्पादनात घट आणि झालेले नुकसान यामुळे ते अधिक तीव्रतेने जाणवत आहे. केळीची आवक ही फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वाढेल. थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर वाढीव तापमानाचा केळी निर्यातीला देखील फायदा होईल व निर्यातीला चालना मिळेल. यादृष्टीने काही कंपन्या निर्यातीचे देखील तयारी करीत आहे.यामुळे बाजारांमध्ये केळीचे मागणी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वाढेल व दरात वाढ होईल अशी अपेक्षा उत्पादकांना आहे.
Published on: 02 February 2022, 11:28 IST