Nanded News : महाराष्ट्रात मृत्यू तांडव सुरुच आहे. नांदेडमध्ये मागील ४८ तासांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात मागील २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयाच्या कोणत्याही चुकीमुळे यातील कुणाचा मृत्यू झाला नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूबाबत शरद पवार यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली....!
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मागील ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार नवजात बालकांचा समावेश असून गेल्या ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. रुग्णालय प्रशासन धिम्म असून औषधांच्या कमतरतेमुळे हे झाल्याचे विद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी नाकारले आहे.
नांदेडमधील दुर्घटेनंतर अशोक चव्हाण यांनी ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे. ट्विट करत अशोक चव्हाण म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यु होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याची आवश्यकता आहे.
क्षमता ५०० रूग्णांची असताना आज तिथे सुमारे १ हजार २०० रुग्ण दाखल आहेत.सदर रुग्णालयात दाखल ७० गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असेल तर खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, अशी सूचना मी प्रशासनाला केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पाठविणार असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, येथील असुविधा व अडचणींबाबत माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा झाली. रुग्णालयाची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी मी त्यांना केली आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज मी कोणत्याही निष्कर्षावर जाणार नाही. चौकशीअंती दोष कुणाचा हे स्पष्ट होईल. परंतु, राज्य सरकारने तातडीने रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Published on: 03 October 2023, 01:13 IST