Solapur News : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा, तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनास तत्काळ सादर करावा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदूणे, अमित माळी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रलंबित ई-केवायसीचे कामही जलदगतीने पूर्ण करुन घ्यावे. पिकविमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे असून मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या प्रलंबित पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच पिक विमाची प्रक्रिया करताना काही त्रुटी आढळल्यास त्या दूर कराव्यात. यासाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी चारा व पाणी टंचाई बाबतचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होईल याबाबत पशुसंवर्धन व कृषी विभागाने नियोजन करावे. तसेच धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे. त्याचबरोबर मराठा कुणबी नोंदीची तपासणी तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केल्या आहेत.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमार 37 हजार 72 हेक्टर वरील क्षेत्र बाधित झाले असून आतापर्यंत दहा हजार 131 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 37 हेक्टरचे पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 12 लाख 51 हजार जनावरांची संख्या असून जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होईल. याबाबत पशुसंवर्धन व कृषी विभागा आणि नियोजन केले तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत पाण्याचे चार टँकर सुरू असून तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात मराठा कुणबीच्या 36 हजार 903 नोंदी सापडल्या असून नोंदी तपासणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
Published on: 05 December 2023, 02:58 IST