यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे गणित पूर्णपणे बिघडलेले आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन व उडीद पिकाचे नुकसान झाले तर आता ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे तूर व कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव पडत आहे. ज्वारी चे पीक वगळता इतर पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.खरीप हंगामातील नुकसान शेतकऱ्यांनी बाजूला काढले आणि आता रब्बी हंगामातील पेरण्यावर भर दिला आहे. नोव्हेंबर महिना हा अंतिम टप्पा असून सुद्धा जवळपास निम्या क्षेत्रावर अजून पेरा झालेला नाही. अवकाळी पावसाने पेरण्या लांबल्या आहेत त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होतो. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे नियोजन करावे आणि काळजी घ्यावी.
कापूस वेचणी तुर्तास थांबवावी:-
सध्या कापूस वेचणी चा काळ सुरू आहे मात्र मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कापूस वेचणी सुरू ठेवली तर बोंडाचे नुकसान होईल आणि बोंड गळती सुद्धा वाढेल.आधीच बोंडाअळी चा प्रादुर्भाव वाढल्याने बोंडाचा दर्जा पूर्णपणे ढासळलेला आहे यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. कापसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन पदरात पाडून घ्यायचे असेल तर चांगल्या वातावरणात वेचणी केली पाहिजे.
रब्बीतील पिकांची उगवण झाली किडीचा प्रादुर्भाव:-
रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झालेली आहे मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पेरण्या लांबलेल्या आहेत आणि याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.हरभरा राजमा, करडई या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. करडई या पिकावर उंटअळी आणि मावा चा किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन लावणे गरजेचे आहे.
फळबागांचेही नुकसानच:-
सध्या द्राक्षाची काढणी सुरू आहे मात्र या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसाने द्राक्षाच्या घडात पाणी शिरत असल्याने द्राक्षे सडत आहेत. पुणे आणि इंदापूर भागात अवकळी पावसाने नुकसान झाले आहे.कालच्या रविवारी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांच्या बागेचे नुकसान झाले आहे. आंब्याला मोहर आला आहे मात्र या वातावरणामुळे मोहर सुद्धा गळत आहे. सुमारे १ नोव्हेंबर पासून आंब्याचे नुकसान होण्यास सुरू झाले.
ज्वारीला मात्र होणार जोमात वाढ:-
रब्बी हंगामातील पेरणीला उशीर झाला असला तरी सुद्धा पहिल्या टप्यात शेतकरी वर्गाने ज्वारी पेरणी वर भर दिला त्यामुळे ६० टक्के मराठवाडा मध्ये ज्वारीचा पेरा झालेला आहे. आता पावसामुळे ज्वारी चे पीक जोमात वाढेल असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.
Published on: 23 November 2021, 11:39 IST