मराठवाडयात सध्यस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशी बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे, तसेच सध्या गुलाबी बोंडअळीच्या मागील पिढीच्या कोषावस्थेत गेलेल्या अळ्यांच्या कोषातून पतंग निघण्यास सुरुवात झाली असून असे पतंग मिलन करून कपाशीवर अंडी देण्यास सुरुवात करतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतामध्ये कामगंध सापळे लावलेले आहेत व त्यामध्ये लावलेल्या गुलाबी बोंडअळीचे ल्युअर (गोळी) लावून तीन ते चार आठवडे कालावधी झाला असेल अशांनी लवकरात लवकर सदरील ल्युअर (गोळी) बदलून घ्यावी. बदलताना हाताचा कमीत कमी स्पर्श होईल याची काळजी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कामगंध सापळे लावलेले नाहीत अशांनी आपल्या शेतामध्ये एकरी आठ या प्रमाणे कामगंध सापळे लावून घ्यावेत. उशिरा लागवड केलेल्या कपाशी मध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास वेळीच वेचून नष्ट कराव्यात.
संबंधित बातमी वाचण्यासाठी: क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत विविध गावांत मार्गदर्शन
येणा-या आठवड्यात पुढील पैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी जेणे करून गुलाबी बोंडअळीचा पुढे होणारा प्रादुर्भाव योग्य वेळी रोखता येईल. यात प्रती एकर बिव्हेरीयाबॅसिआना 1.15% (जैविकबुरशी)- 1000 ग्रॅम (याची फवाराणी वातावरणात आद्रर्ता असतानाच फक्त करावी) किंवा पायरीप्राॅक्झीफेन 5% अधिक फेनप्रोपॅथ्रीन 15% - 200 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% अधिक लॅम्बडासायहॅलोथ्रीन 9.5% -80 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% अधिक असिटामाप्रीड 7.7% -200 मिली यापैकी कोणतयाही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
सदरील किटकनाशक हे रसशोषक किडींचेही व्यवस्थापन करतात, त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता वेगळे किटकनाशक घेण्याची आवश्यकता नाही. सदरील किटकनाशकाचे प्रमाण हे सर्व प्रकारच्या फवारणी पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकरी या प्रमाणेच वापरावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.
Published on: 08 September 2018, 09:18 IST