Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. कर्जत येथे झालेल्या विचारमंथन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्या टीकेला रोहित पवार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कर्जत येथील विचारमंथन कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या सुरु असलेल्या संघर्ष यात्रेवर टीका केली होती. यावेळी अजित पवार म्हणाले होते की, "काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?" असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता.
रोहित पवार यांनी काय दिले प्रत्युत्तर?
रोहित पवार यांनी सोशल मिडीया ट्विटर X वरुन अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय अजित दादा,युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.
युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या #युवा_संघर्ष_यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही.
तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे,भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या.
Published on: 02 December 2023, 12:05 IST