मुंबई: राज्यात सागरी उत्पादनवृद्धीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग, कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन फाऊंडेशन आणि सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपेडा), केरळ यांच्यात आज वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील उभा दांडा येथे खेकडा व जिताडा मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अरुण विधळे, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष के. एस. श्रीनिवास, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक एन. वासुदेवन, एमपेडाचे सचिव बी. श्रीकुमार, प्रकल्प संचालक डॉ. एस. कंदन, मत्स्य व्यवसाय सहआयुक्त श्री. राजेंद्र जाधव, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री आदी उपस्थित होते.
मत्स्य व्यवसाय विभागामार्फत हे केंद्र उभारणार असून एमपेडा यासाठी तांत्रिक सल्ला देणार आहे. कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन फाऊंडेशनचे सहकार्य व आर्थिक सहाय्यातून हे मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे.
Published on: 01 February 2019, 08:32 IST