शेतकऱ्यांना कृषीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उस्मानाबाद, पालघर जिल्ह्यात देशी गाईंचा ‘काऊ क्लब’ स्थापन करण्याबाबतची संकल्पना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मांडली आहे.
केंद्र शासनाने नीती आयोगाची स्थापना करून देशात आकांक्षित जिल्ह्यांची निवड केली आहे. या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य होत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची निवड झाली असून या दोन बाबीचा संदर्भ घेऊन राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी शेतकऱ्यांकरिता कृषीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी राज्यातील उस्मानाबाद, पालघर या दोन जिल्ह्यात देशी गाईंचा काऊ क्लब स्थापन करण्याबाबत संकल्पना मांडली आहे. सन 2022 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजनेचे स्वरुप तयार करून त्यास तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना व्हावा, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान योजना सुरू केली आहे.
काऊ क्लबची संकल्पना
“काऊ क्लब” या प्रस्तावित योजनेमध्ये उस्मानाबाद व पालघर जिल्ह्यांतील लाभार्थींनी सामुहिक तत्वावर व सामाईक पद्धतीने दुधाळ देशी गाईंचे पालन करुन दुग्धोत्पादन घेणे, या दुधावर आवश्यक संस्करण आणि प्रक्रिया करुन दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ विशिष्ट ब्रांड विकसित करुन त्याची विक्री करणे याचा समावेश असणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या सामाईक पद्धतीने गोसंगोपनातून उपलब्ध होणारे शेण आणि गोमुत्र यापासून विविध उत्पादन (उदा. जीवामृत, बिजामृत ईएम, सेंद्रीय खत, पंचगव्य, बायोफर्टीलायझर इ.) तयार करुन विशिष्ट ब्रँँड प्रस्थापित करुन विक्री करणे, शेतकरी व पशुपालकांना आदर्श गोसंगोपन पद्धती, शेण व मूत्र यांच्यापासून उत्पादने इ. बाबींचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कृषी तथा पशुसंवर्धन पर्यटन केंद्राची स्थापना करणे, आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार पद्धतींचे अद्ययावत केंद उभारणे, सेंद्रीय पद्धतीने विषमुक्त उत्पादने घेण्याच्या पद्धतीने प्रात्यक्षिक युनिट स्थापन करणे आणि वैरण विकासाचे, वैरणदायी वृक्ष इत्यादींंचे प्रात्यक्षिक युनिट प्रस्थापित करणे अशा सर्व घटकांचा समावेश प्रस्तावित आहे.
याप्रमाणे एकात्मिकृत युनिट स्थापन केल्यास लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्याबरोबरच पर्यटनात वाढ होणार आहे, मुक्त गोठा, सेंद्रीय उत्पादनांचे प्रात्यक्षिक यासारख्या उपक्रमामुळे शेतकरी व पशुपालकांना अद्ययावत पशुसंवर्धन पद्धतीची माहिती होऊन त्यांचा अंगीकार होण्याच्या दृष्टीनेही निश्चित फायदा होणार आहे.
Published on: 12 September 2018, 09:45 IST