अकोला : जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत आज कापसाच्या दराने 10 हजारांचा टप्पा पार केला असून गुरुवारी, 13 जानेवारी रोजी 10,315 रुपये प्रति क्विंटल दराने एका शेतकऱ्याचा कापूस खरेदी करण्यात आला. याशिवाय इतर शेतकऱ्यांनाही 8500 ते 10,100 पर्यंत भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.
यावर्षी खरिप व रब्बी पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत होते.
मात्र दिवाळीनंतर अचानक कापसाची आवक वाढू लागली. नशिबाने कापसाला चांगला भावही मिळू लागला. यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत गजानन नारायण चोपडे (रा. वरुळ जऊळका) या शेतकऱ्याच्या कापसाला प्रति क्विंटल 10 हजार 315 असा विक्रमी भाव मिळाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पाऊस तसेच बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होता. अशाही परिस्थितीत वेळेवर औषध फवारणी करून शेतकऱ्यांनी कमी का होईना कापसाचे उत्पादन घेतले आहे.
अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आपला कापूस अकोटमध्ये विकायला आणत आहेत. अकोटच्या बाजारपेठेत सध्या दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल कापसाची आवक होत असल्याची माहिती अकोट बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.
हमीभावापेक्षा अधिक भाव : विशेष म्हणजे यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5775 तर लांब धाग्याला 6100 हा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे 3500 ते 4000 हजार रूपये अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.
अकोट बाजार समितीत गजानन नारायण चोपडे (रा. वरुळ जऊळका) या शेतकऱ्याच्या कापसाला प्रति क्विंटल 10 हजार 315 असा विक्रमी भाव मिळाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे येथील कापसाची आता प्रति क्विंटल बारा हजार रूपयांकडे वाटचाल सुरू आहे.
Published on: 15 January 2022, 03:14 IST