राज्यात कापसाच्या भावात चांगलाच भडका उठलेला आहे. अमरावती जिल्ह्यात ही कापसाला विक्रमी बाजार भाव मिळत आहेत. कापसाला जवळपास हमीभावापेक्षा दीडपट अधिक बाजारभाव मिळत असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी बाजारपेठेत कापसाची आवक पूर्णता मंदावली आहे.
बाजारपेठेतील हे चित्र बघता कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना तसेच तज्ञांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्पादनात घट झाली असल्याने आगामी काही दिवसात कापसाच्या बाजार भावात अजून वाढ होऊ शकते असा शेतकऱ्यांचा अंदाज असल्याने अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या पन्नास वर्षात या खरीप हंगामात प्रथमच कापसाने दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा पल्ला गाठला आहे. सध्या मिळत असलेला बाजार भाव हमीभावापेक्षा दीडपट अधिक असल्याचे सांगितले गेले आहे. मागील खरीप हंगामापर्यंत कापसाला कधीच येवढा बाजार भाव मिळाला नव्हता.
कृषी तज्ञांच्या मते, कापसाच्या उत्पादनात सरासरीपेक्षा घट झाल्याने व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने मागणी आणि पुरवठ्याचे ताळमेळ होत नसल्याने कापसाच्या भावात झळाळी आली आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात नऊ हजार 700 रुपये प्रतिक्विंटल ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा कापसाला बाजार भाव मिळत आहे. शासनाने लॉंग स्टेपलच्या कापसाला 6025 रुपये प्रति क्विंटल व मध्यम स्टेपलच्या कापसाला पाच हजार 725 प्रतिक्विंटल असा हमी भाव ठरवून दिला आहे. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच हमी भावापेक्षा अधिक दर कापसाला मिळत आहे.
सध्या कापसाला मिळत असलेला दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे. मात्र आगामी काही दिवसात कापसाला पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर प्राप्त होऊ शकतो अशी शेतकर्यांची आशा असल्याने अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवले आहे. त्यामुळे बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली असून बाजारपेठ कापसाविना विराण नजरेस पडते.
Published on: 08 February 2022, 09:38 IST