यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला प्रचंड मागणी असल्याने, कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे. देशात सर्वत्र कापसाचे उत्पादन घटल्याने बाजार भावात तेजी असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात खानदेश विदर्भ समवेतच अनेक विभागात कापसाचे उत्पादन घेतले जाते. विदर्भात देखील यावेळी बऱ्यापैकी कापसाची लागवड नजरेस पडत आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात या वर्षी कापसाला दहा हजार रुपयापर्यंत बाजार भाव प्राप्त झाला आहे. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्ड मध्ये 20 तारखेला कापसाला दहा हजार रुपये क्विंटल दर मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे.
यावेळी कापसाला जरी दहा हजार रुपये पर्यंतचा विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असला तरी कापूस उत्पादक शेतकरी अजून भाव वाढ होईल या आशेने कापसाची विक्री करण्याऐवजी कापसाचे भंडारण करताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत पांढरे सोने विक्रीसाठी अद्यापही मुबलक प्रमाणात येताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यात कापसाचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे, या तालुक्याचे कापूस एक प्रमुख पीक आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी कापसाच्या पिकावर अवलंबून असतात आणि या शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कापूस पिकावर आहे. यावर्षी तालुक्यात कापसाची लागवड बऱ्यापैकी नजरेस पडली होती, मात्र वातावरणातील बदलामुळे, वारंवार अवेळी येत असलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकावर रोगांचे सावट संपूर्ण हंगामात बघायला मिळाले, त्यामुळे नेहमीप्रमाणे कापसाची झडती झाली नाही, म्हणून कापसाच्या उत्पादनात खूप मोठी घट झाली आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, यावर्षी या परिसरात सुमारे तीस टक्के कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे कापसाला चांगला बाजार भाव प्राप्त होत आहे. मात्र असे असले तरी परिसरासमवेतच संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाच्या बाजार भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी केवळ गरजेपुरता कापूस विक्री करताना नजरेस पडत आहे. अनेक ठिकाणी कापसाला दहा हजार रुपयापेक्षा अधिक बाजारभाव प्राप्त होत आहे, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे भाव अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल होण्याची आशा आहे.
म्हणून परिसरातील अनेक शेतकरी कापूस विक्री करण्यापेक्षा कापसाच्या दरात भाववाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. एकंदरीत परिसरातील शेतकरी जोपर्यंत कापसाला आणखी चांगला बाजार भाव प्राप्त होत नाही तोपर्यंत विक्री करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये.
Published on: 21 January 2022, 01:00 IST