शेतकरी मित्रांनो कापसाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे, खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट नमूद करण्यात आली. खरीप हंगामात अतिवृष्टी व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता, त्यामुळे राज्यातील खानदेश मराठवाडा समवेतच संपूर्ण विभागात कापसाचे उत्पादनात विक्रमी घट झाली होती.
एकीकडे उत्पादनात झालेली घट तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची वाढलेली मागणी या दोन्ही कारणांमुळे देशांतर्गत बाजारपेठेत कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. मात्र आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात या चालू आठवड्यात कापसाच्या बाजार भावात चढ-उतार बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापसाची विक्री करावी की कापसाची साठवणूक करावी याबाबत संभ्रम अवस्थेत सापडला आहे. शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सेलू मध्ये अद्यापपर्यंत पावणेदोन लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात कापसाच्या भावात तेजी बघायला मिळाली होती, कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपयापर्यंत बाजार भाव प्राप्त होत होता. 18 जानेवारी रोजी कापसाला जिल्ह्यात 9995 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता. मात्र अवघ्या सहाच दिवसात या विक्रमी बाजार भावाला सेंध लागली असून 22 तारखेला कापसाला मात्र 9 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढाच बाजार भाव मिळाला, म्हणजे जवळपास 800 रुपयांपर्यंत ची घसरण कापसाच्या बाजारभाव नमूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कापसाच्या भावात अचानक झालेल्या घसरणीमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला असून आता पुढे काय करायचे कापूस विक्री करायचा कि पुन्हा एकदा साठवणूक करायची अशा संभ्रमावस्थेत सापडल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव रुई आणि सरकीच्या किमतीवरून ठरवले जातात, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या रुईची आणि सरकीचे भाव डगमगलेत की याचा परिणाम कापसाचा बाजारभाव होतो असे सांगितले जाते. परभणी शहरात तालुक्यासह इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जातो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी कापसाचे बाजार भाव वाढण्याची आशा होती मात्र सोमवारी देखील कापसाच्या बाजार भावात वाढ बघायला मिळाली नाही.
सोमवारी कापसाला जास्तीत जास्त 9 हजार 885 तर कमीत कमी आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच दर प्राप्त झाला, तर सरासरी दर हा 9840 प्रति क्विंटल एवढा मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता कापसाला जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत होता त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि शेतकऱ्यांना अशा होते की भविष्यात कापसाचे दर अजून वाढतील मात्र सध्यातरी कापसाचे दर वाढण्याच्या स्थितीत दिसत नाहीत.
Published on: 25 January 2022, 08:05 IST