सोमिनाथ घोळवे
मुळात कापसावर बोंड अळी आणि तांबेरा रोग पडल्याने फारसे उत्पादन हाती मिळत नाही. सलग तीन वर्षांत शेतीतून कापसाचे उत्पादन न मिळण्याचा अनुभव आहे. तर कापूस लागवड नको म्हणून कापसाऐवजी सोयाबीन आणि ज्वारी पीक घेण्याचा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. किमान एक पीक तरी हाती लागेल अशी शाश्वती शेतकऱ्यांना हवी. पण ती शाश्वती मिळत नाही. परिणामी कापसाचे पीक म्हणजे शेतकऱ्यांसाठी पांढरे सोनं होतं. पण गेल्या 6 ते 7 वर्षात ह्या सोन्याची चित्तरकथा होऊन पूर्णपणे कळवंडून गेलेले आहे.
सदस्थिती ग्रामीण भागात काही परिसरात "पांढऱ्या सोन्याची" वेचणी चालू झाली आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. जेथे गारपीट झाली तेथे कापसाच्या वाती झाल्या. तर बऱ्यापैकी खराब झाला. पण जेथे निव्वळ पाऊस झाला होता, तेथे कापसाला पोषक झाला असे शेतकऱ्यांची मतं आहेत. कारण आताचा पाऊस आणि हिवाळ्यातील थंडीमुळे कापसाला बोंड लागतील असा आशावाद आहे. पण प्रश्न आहे तो, खरीप हंगामात कापसाला बोंड किती आहेत?. त्यातही कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कापसाची काय अवस्था आहे?. एक जास्तीत जास्त दोन वेचणीत कापसाच्या झाडाला काहीच शिल्लक राहिलेले नाही. थेट रोटर किंवा नांगरट करण्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे.
कापसाला काय भाव मिळतोय तो प्रश्न वेगळाच. पण प्रश्न उत्पादन मिळण्याचा आहे. 2019 आणि 2021 मध्ये काय एकरभर शेतात किमान 6 ते 8 क्विंटलचे सरासरी उत्पादन मिळत होते. त्याच शेतामध्ये आता 50 किलो ते 1 क्विंटल कापूस मिळत नाही असे मत अनेक शेतकऱ्यांचे आहे. (यास काही परिसरात सरासरी कापूस उत्पादन मिळत आहे. हा आपवाद आहे) ऐवढी घसरण पाऊस कमी होण्यामुळे नाही तर रोगराई, हवामान बदल, शेती निविष्ठांच्या दर्जाची घसरण असे अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत. दुसरे अलीकडे कापसाच्या पिकाला पांढरे सोने म्हणता येत नाही. पांढरे सोने पिकवण्यासाठी येणारा खर्च आणि विक्रीसाठी निर्माण झालेला अडथळा या कारणांनी शेतकऱ्यांना नकोसे झालेले आहे. मराठवाड्यासह सर्वत्र हळूहळू या पांढऱ्या सोन्याची लागवड खूप कमी झाली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी ही अवस्था गेल्या पाच वर्षापासून आहे.
कापसाच्या लागवडी संदर्भात एक शेतकरी अनुभव सांगतात की, प्रत्येक वर्षी कापूसाची लागवड करत आलो आहे. पण २०२१ पासून एकही झाड लावले नाही. कारण कापसाच्या लागवडीचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त झालाय. अर्थात अलीकडे जर परतावा पुरेसा मिळत नसेल तर त्या पिकाची लागवड का करायची? गेल्या चार वर्षापासून माझी कापूस शेती तोट्यात गेली आहे. (चर्चा नोव्हेंबर 2023) बीटी कॉटन आणि कनक हे बियाणे होते तो पर्यंत उत्पादन चांगले मिळत होते.
अलीकडे दोन्ही बियाणांच्या वाणामध्ये बोगस बियाणे किंवा रोगराईला पोषक असणारे बियाणे आले आहे. तांबडा रोग पडल्यानंतर त्यावर पाच वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली तरी काहीच फरक पडत नाही. पाच वर्षापूर्वी तांबडा रोग पडत नव्हता, कारण बियाणे अस्सल होते. शिवाय विविध रोगांना नैसर्गिक रित्या प्रतिकार होत होता. सुरेश शेतकरी सांगतात की,सात वर्षापूर्वी कापसावर फवारणी करण्याची गरज नव्हती. पण आता पाच -पाच फवारणी केली तरी रोगराई कमी होत नाही. उत्पन्नामध्ये देखील खूप मोठी घसरण झाली आहे.
या वर्षी कापसाला हमीभाव 6620 रुपये (मध्यम धागा) ते 7020 हजार रुपये (लांब धागा) जाहीर झालेला आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी एकाधिकार केंद्रावर कापूस न घालता व्यापाऱ्यांकडे विकला त्यांना व्यापाऱ्यांनी 6000 ते 6969 रुपये प्रती क्विंटल भाव दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीमध्ये 6900 ते 7100 रुपये भाव मिळालेला आहे. हा मिळालेला भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मतानुसार कापसाला कमीत कमी एक क्विंटलचे उत्पन्न घेण्यासाठी 8 ते 9 हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे 12 ते 13 हजार रुपये प्रती क्विंटल असणे गरजेचे आहे. मात्र कापसाचे एकरी उत्पादन किमान 7 ते 9 क्विंटल मिळणे गरजेचे आहे. तरच एकरी नफा किमान 32 ते 36 हजार नफा होऊ शकतो. हा नफा उत्पादन खर्चाच्या तुलनेत जेमतेम आहे.
(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ई-मेल - sominath.gholwe@gmail.com
Published on: 02 December 2023, 06:01 IST