अकोला: विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो. मात्र आता विदर्भातील बाजारपेठेत कापसाच्या बाजार भावात चढ-उतार बघायला मिळत आहे. कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असता बाजार भावात होणारी ही चढ-उतार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखी सिद्ध होत आहे. बाजारपेठेतील हे चित्र बघता कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था कायम आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी विदर्भातील कापसासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी अकोट बाजारपेठमध्ये कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर प्राप्त होत होता.
पांढर्या सोन्याला प्राप्त झालेली ही झळाळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब होती. मात्र आता कापसाच्या हंगामाच्या शेवटी शेवटी 11000 वर गेलेले कापसाचे दर पुन्हा एकदा खाली आले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दराबाबत संभ्रमावस्था असून थोडीशी नाराजी देखील बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी अजूनही कापसाला हमीभावापेक्षा कितीतरी अधिक बाजार भाव मिळत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी समाधानी आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाकापूस अकरा हजार प्रति क्विंटलपर्यंत गेल्यावर कापसाचे भाव अजून वधारतील आणि कापूस पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जाईल अशी आशा होती मात्र शेतकऱ्यांची ही आशा आता फोल ठरत आहे, कारण की कापसाचे बाजार भाव आता अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल वरून खाली आले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात या हंगामात रुई आणि सरकीच्या दरात मोठी वाढ झाली होती. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारासमवेतच देशांतर्गत तमाम बाजारपेठेत कापसाला मोठा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. कापसाला दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने बाजारभावात वृद्धी होत असल्याचे तज्ञांद्वारे सांगितले गेले. विदर्भातील कापसासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार पेठ मध्ये देखील कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे. अकोट मध्ये सध्या कापसाला दहा हजार रुपयांहून अधिक दर मिळत आहे. कापसाला सध्या मिळत असलेला दर हमीभावापेक्षा साडेचार हजार रुपये अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला होता मात्र कापसाला मिळत असलेला हा विक्रमी बाजार भाव शेतकऱ्यांसाठी संजीवनीचे कार्य करत आहे.
एक तारखेला अकोट बाजार समितीत कापसाला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी आणि या हंगामातील उच्चांकी दर मिळाला होता. तज्ञांच्या मते, 50 वर्षातील हा विक्रमी बाजार भाव होता. मात्र दुसर्याच दिवशी अकरा हजारावर गेलेला कापूस सहाशे रुपये घसरणीने दोन तारखेला दहा हजार 425 रुपये प्रतिक्विंटल वर येऊन ठेवला. एक तारखे पेक्षा जरी हा दर कमी असला तरी सध्या मिळत असलेल्या कापसाच्या दरामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठा समाधानी आहे मात्र असे असले तरी दरात सतत होत असलेली चढ-उतार यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे.
Published on: 03 February 2022, 08:11 IST