गेल्या अनेक वर्षांपासून कापसाच्या बाजार भावात सतत घसरण बघायला मिळत होती, मात्र कापसाच्या बाजार भावात यंदा विक्रमी तेजी बघायला मिळाली आहे. या खरीप हंगामातील कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. अकोला जिल्ह्यात देखील कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी कापसाच्या बाजार भावात अजून वाढ होण्याची आशा बाळगत आहेत. अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एक क्विंटल कापसातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तीन ग्रॅम सोने खरेदी करण्याचा जणू अट्टाहासच धरला आहे.
असं सांगितलं जातं की, भारतात 1972 साला च्या दरम्यान सोन्याला पंचवीस रुपये ग्रॅम एवढी किंमत होती. आणि त्या काळात कापसाला 250 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव होता. त्यावेळी शेतकरी बांधव एक क्विंटल कापसाच्या विक्रीतून एक तोळा सोने खरेदी करू शकत होते. तेव्हापासून कापसाला पांढरे सोने म्हणून संबोधले जात असल्याचा दावा शेतकरी बांधव करतात. असे असले तरी, 1972 नंतर सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ नमूद करण्यात आली आणि सोन्याचे बाजार भाव आता आकाशाला गवसणी घालत आहेत मात्र कापसाच्या बाजार भावात अपेक्षित भाववाढ अद्यापही झालेली नाही, याउलट कापसाचा उत्पादन खर्चात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्याचे चित्र आत्तापर्यंत बघायला मिळत आहे. परंतु कापसाचे बाजार पेठेतील चित्र या खरीप हंगामात पूर्णता पलटून गेल आहे आता कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे आणि म्हणून कापूस उत्पादक शेतकरी 1972 मध्ये ज्याप्रमाणे एक क्विंटल कापूस विक्री करून दहा ग्रॅम सोने खरेदी केले जाऊ शकत होते अगदी त्याचप्रमाणे या हंगामात एक क्विंटल कापूस विक्रीतून तीन ग्रॅम सोने खरेदी करण्याचा शेतकरी बांधवांनी अट्टाहास धरला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या कापसाची विक्री करणे टाळले असून कापसाची साठवणूक करताना शेतकरी बांधव नजरेस पडत आहेत.
केंद्र सरकारने कापसासाठी हमीभाव 5726 व 6025 प्रति क्विंटल एवढा ठेवला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढल्याने यावर्षी देशांतर्गत व स्थानिक बाजारपेठेत कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव मिळत आहे. सरकारने दिलेल्या हमी भावापेक्षाही खुल्या बाजारपेठेत कापसाला अधिक बाजार भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच देशांतर्गत टेक्स्टाईल उद्योगात कापसाची मागणी वाढल्याने कापसाला या हंगामात तब्बल दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. तसेच भविष्यात कापसालाअशीच मागणी कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने भविष्यात कापसाचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते, आगामी काही दिवसात कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळू शकतो. बाजारपेठेतल हे चित्र बघता आणि तज्ञांचा सल्ला विचारात घेता अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. जर कापसाला खरच एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला तर कापूस उत्पादक शेतकरी एक क्विंटल कापसात सुमारे तीन ग्रॅम सोने सहज विकत घेऊ शकतो.
Published on: 01 February 2022, 01:51 IST