शेतकरी राजा गत वर्षापासून अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता हैराण झाला आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी राजाचे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाच्या पिकाचे देखील खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते अवकाळी सदृश्य स्थिती व ढगाळ वातावरण यामुळे कापसाच्या पिकावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता त्यामुळे उत्पादनात विक्रमी घट नमूद करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कापसाला या हंगामात कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला आहे त्यामुळे उत्पादनातील घट वाढीव बाजारभाव भरून देत आहे. परंतु विक्रमी बाजारभाव प्राप्त होऊन देखील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा गंडा लागण्याची शक्यता आहे.
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मेडशी गावातील रहिवासी कापूस उत्पादक शेतकरी प्रवीण देविदास सोलनोर यांची कापूस विक्री करताना वजन करतांना फसवणूक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवीण यांचा कापुस खरेदी करण्यासाठी अकोला येथील बार्शीटाकळीचे काही व्यापारी त्यांच्या गावात आले होते, कापसाची मोजणी हे व्यापारी इलेक्ट्रिक काट्यावर करत होते. काट्यावर कापसाचे वजन सुरू असताना हे व्यापारी प्रवीण यांना वारंवार पिण्याच्या पाण्याची मागणी करत होते, त्यांचे हे कृत्य प्रवीण यांना खटकले. याशिवाय कापूस खरेदी करणाऱ्या पैकी एकाच्या हालचाली प्रवीण यांना मोठ्या संशयास्पद वाटल्या. प्रवीण यांना त्यांचे वागणे संशयी वाटल्याने त्यांनी त्या व्यापाऱ्यांची झडती घेतली तेव्हा त्यांना व्यापाऱ्याच्या खिशात एक रिमोट आढळले. हे गाव गुंड व्यापारी रिमोटद्वारे इलेक्ट्रिक काटा कंट्रोल करत होते प्रवीण यांना आपली फसगत होत असल्याचे समजताच त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली व याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी ताबडतोब प्रवीण यांच्या तक्रारीची दखल घेत प्रवीणच्या गावाकडे मोर्चा वळवला व कापूस खरेदी करणारे सर्व व्यापारी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सर्व स्वयंघोषित व्यापारी बार्शी टाकळी येथील रहिवासी आहेत.
या सर्व व्यापाऱ्यांवर भारतीय कायद्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, न्यायालयाने या स्वयंघोषित व्यापाऱ्यांना तीन दिवसाची जेलची हवा खाण्यासाठी पाठवले. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याने या हंगामात गावोगावी फिरून कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. असे गावागावात फिरून कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून बाजारपेठेपेक्षा थोड्या कमी दरात कापूस खरेदी करतात, शेतकऱ्यांना देखील या बाबत सर्व ज्ञात असते मात्र शेतकऱ्यांचा वाहन खर्च व परिश्रम वाचत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी देखील अशा व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्यास प्राधान्य देतात.
पण गावातच कापूस विक्री करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सजग राहणे अनिवार्य आहे नाहीतर यामुळे त्यांच्यासोबत मोठा दगाफटका होऊ शकतो. आणि त्यामुळे मोठी वित्तहानी होण्याचा धोका कायम आहे. शेतकऱ्यांनी जर गावात आलेल्या व्यापाऱ्यांना कापूस विक्री केला तर काटा होत असताना विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. नाहीतर असे व्यापारी कापसाच्या वजनात झोल करू शकतात आणि त्यामुळे विक्रमी बाजार भाव असतानादेखील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
Published on: 23 January 2022, 11:18 IST