राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. कापसाची शेती विशेषता खानदेशमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळते. या व्यतिरिक्तही राज्यातील इतर भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. गेल्या काही वर्षांपासून मात्र खरीप हंगामातील या मुख्य पिकावर बोंड आळीचे सावट कायम राहिले आहे यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट दरवर्षी नमूद केली गेली आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बोंड आळी चा बंदोबस्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविल्या मात्र सर्वच उपायोजना कुचकामी सिद्ध झाल्या आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते येत्या हंगामात देखील बोंड अळीचे सावट कायम राहणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंड आळी चा बंदोबस्त करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाने यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला देखील जारी केला आहे.
गेल्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पावसाचा कालावधी लांबल्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जानेवारीनंतर देखील कापसापासून उत्पादन घेतले आहे. याशिवाय गत वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापसाचे उत्पादन घेतले आहे.
यामुळे बोंड अळीला पोषक वातावरण मिळाले असून येत्या हंगामात याचा विपरीत परिणाम कापसाच्या पिकावर बघायला मिळणार आहे. निश्चितच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक मोठे संकट उभे राहणार आहे. या अनुषंगाने कृषी विभागाने देखील कंबर कसली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
कृषी विभागाचा सल्ला नेमका काय?
»कापसाची वेचणी पूर्ण आपटल्यानंतर शेतात उभ्या असलेल्या पऱ्हाट्या रोटर तसेच श्रेडर या यंत्राद्वारे बारीक करून जमिनीत गाडाव्या किंवा पऱ्हाट्या वेचून शेताबाहेर त्यापासून कंपोस्ट खत तयार करून कापसासाठी वापरावे.
»जमिनीची एप्रिल ते मे महिन्यात खोल नांगरणी करावी.
»याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचे आघात लागवड म्हणजे मे मध्ये केली जाणारी लागवड टाळावी.
»बीटी कापसाची किंवा सरळ वाणांची जून महिन्यात लागवड करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
»बोंड अळीच्या जिवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
»कपाशी लागवड करायची असल्यास कापसाच्या आजूबाजूला नॉन बीटी कपाशीची लागवड करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
»कापसाची लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून योग्य त्या खतांचा वापर करावा तसेच नत्र खतांचा वापर मर्यादेत करण्याचे यावेळी आव्हान करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
काय मिळाले! अज्ञात माणसाने अडीच एकर टरबूज शेती वर फवारले कीटकनाशक; लाखोंचे नुकसान
Published on: 27 April 2022, 09:45 IST