देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ३८ हजार ८४५ झाला आहे. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. देशात गेल्या २४ तासात ६ हजार ९७७ कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील २४ तासात १५४ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४ हजार २१ जणांचा मृत्यू झाला असून ५७ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट ४१.५७ टक्के आहे. तर मागील २४ तासांत ३ हजार २८० कोरोनामुक्त झाले. भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण ७७ हजार १०३ आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात काल सर्वाधिक ३ हजार ४१ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजार २३१ झाला आहे. त्यातील १४ हजार ६०० बरे झाले. तर मृतांचा आकडा १६३५ आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे २९.०६ टक्के आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले रुग्ण ३३ हजार ९८८ आहे. मुंबईत ३० हजार ५४२ कोरोनाबाधित असून त्यामधील ९८८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. भारतात कोरोनाबाधित पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत एक लाख ३८ हजार ८४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांचे क्रमांक येतात.
Published on: 25 May 2020, 12:25 IST