जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे शेती उद्योगही प्रभावित होत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फळभाज्या आणि फळे गोदामामध्ये पडून आहेत. यामुळे व्यापाऱ्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठा बंद पडल्या आहेत. कोरोना संसर्ग आजार असल्याने शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरांमधील बाजारपेठा आणि आठवडी बाजारपेठा या बंद पडत आहेत.
परभणीतील आठवडे बाजारही बंद करण्यात आला असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील बाजारपेठांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. राज्यातील निर्यात होणाऱ्या फळ भाज्या आणि भाजीपाल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे. देशातून एकूण निर्यातीपैकी ६५ टक्के फळे आणि ५५ टक्के भाजीपाला निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपिटीनंतर आता कोरोनामुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील फळे, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. याविषयीचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. मागील वर्षात २ कोटी ३० लाख ८४ हजार ६९० मेट्रिक टन भाजीपाला, फळे, फुलांची निर्यात झाली होती.
यातून भारताला १ लाख ३० हजार ३८७ कोटी परकीय चलन मिळाले होते. यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा होता. पण यावर्षी मात्र अवकाळी पाऊस त्यानंतर आता कोरोना व्हायरसमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात द्राक्षांची निर्यात सुरु होत होती मार्च महिना लागला तरी द्राक्षांची निर्यात सुरू झालेली नाही. कोरोनाचा पोल्ट्री व्यवसायावरही परिणाम झाला असून चिकन फक्त १० ते २० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. कोरोनाच्या भीतीपोटी पालघरमधील एका शेतकऱ्याने कोंबड्याची नऊ लाख अंडी नष्ट केली. भाजीपाला निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. फळे- भाजीपाला, मटन - चिकन हे पदार्थ नाशवंत असल्याने ते अधिक काळ साठवू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम थेट शेतकऱ्यांवर होत आहे. आंबा निर्यातीवरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे आखाती देशांनी हापूस आंब्याची मागणी थांबवली आहे, यामुळे आंबा विक्रेत्यांची चिंता वाढली आहे.
Published on: 16 March 2020, 01:04 IST