कोल्हापूर : कोरोनाने देशासह जगात थैमान घातले आहे, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चा होताना दिसत आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित वावर आदींवर चर्चा होत असताना सर्वच थरातून जागृती केली जाते. या जाणीव जागृतीत आता शेतकरीही मागे राहिला नाही. जिल्ह्यातील आजरा तालुक्यात साळगाव या गावात तरुण शेतकऱ्याने रोपलावणीसाठी टाकलेल्या भाताच्या तरव्यातून ‘गो कोरोना गो’ असा संदेश दिला. त्याच्या या उपक्रमाची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
सचिन सदाशिव केसरकर या तरुण शेतकऱ्याने भाताचा तरवा कलात्मक पद्धतीने टाकला आहे. आजरा हा तालुका कोकणाला जोडणारा जिल्ह्याचा दुवा आहे. या तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे भाताची रोपलावण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तेथे मेच्या मध्यावर तरवा टाकला जातो. हा तरवा टाकण्यासाठी माडे तयार केले जातात. पण केसरकर यांनी माड्याच्या बाजूला गो कोरोना गो अशी अक्षरे आखून त्यात भात पेरले. उगवणी झाल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना ते वाचता येऊ लागले. त्याच्या या उपक्रमाची दखल प्रशासकीय पातळीवरही घेण्यात आली. आजरा, भुदरगड तालुक्यात कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्याच्या या शेतातील तरव्याचे फोटो, व्हिडिओ तयार केले जात आहेत.
हे व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवले आहेत. केसरकर यांच्या मळवी नावाच्या शेतात इंद्रायणी भात लावण्यासाठी त्यांनी तरवा टाकला. तरवा टाकत असताना सचिन केसरकर आणि मनोहर केसरकर या दोघांना एक कल्पना सुचली. आपण ही महामारी संपवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी गो कोरोना गो ही अक्षरे रेखाटून तरवा टाकण्याचे नियोजन केले. मध्यंतरी पावसाने ओढ दिली , त्यावेळी या दोघांनी या तरव्याची अगदी मनापासून देखभाल करत पाणी, खताचा डोस दिला.
Published on: 22 July 2020, 11:39 IST