मुंबई: शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला असून शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचतगट यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
शहरी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप उपक्रमास गती देण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील शहरी भागातील जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, शहरी भागांमध्ये शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल (अन्न धान्य, फळे,भाजीपाला), प्रक्रिया उत्पादने उपलब्ध व्हावीत, यासाठी कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतीमालाच्या वाहतूक, विक्री आणि साठवणुकीसाठी सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, त्यांच्या वाहनांना विभागाचे बॅनर लावावेत, तसेच कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करावे आणि ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यात नियोजन राहाण्यासाठी ऑनलाईन ॲप विकसित करावे आणि राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि विभागीय किंवा जिल्हास्तरावर स्थायी स्वरुपात कॉप शॉप सुरू करावेत याचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि त्यांच्या संस्थांना शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी होईल, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
अटल महापणन विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या गावातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सद्यस्थितीत ठाणे व मुंबई उपनगर भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कॉप शॉप सुरू केले आहे. त्याला शहरी भागातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, असे कॉप शॉप जास्तीत जास्त ठिकाणी सुरू करण्याची मागणी सुद्धा होत आहे, असे या बैठकीत उपस्थित उपनिबंधकांनी सांगितले.राज्यातील सहकार व पणन विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांनी गृहनिर्माण सोसायट्यांमधील कॉप शॉप योजनेबद्दलची माहिती सादर केली. मुंबईत-67, ठाणे-13, पुणे-20, पनवेल-2 असे कॉप शॉप सुरू झाले आहेत.
सद्य:स्थितीत पालघर,विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, मुरबाड, शहापूर, पुणे, जुन्नर, नाशिक,उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या भागातील सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांशी जोडले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आठवड्यातून ठरवून दिलेल्या दिवशी सोसायट्यांपर्यत पोहोचविण्यात येत आहे.
Published on: 14 February 2019, 07:17 IST