News

मुंबई: सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Updated on 14 May, 2019 7:49 AM IST


मुंबई:
सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिज प्रणालीद्वारे सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉट्सॲपवर येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. सांगली जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता चारा छावण्या सुरु कराव्यात तसेच ज्या तालुक्यांमध्ये पाण्याच्या गरजेनुसार तेथे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनास दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तात्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.

पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ सांगली जिल्ह्यात आजअखेर 16 विंधन विहिरींद्वारे आणि 96 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली असून, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. याशिवाय  पाणी पुरवठा योजनांना नियमित विद्युत पुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठ्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

चारा छावण्या सुरु करण्यास प्राधान्य द्यावे

सध्या सांगली जिल्ह्यात एकूण शासकीय 3 आणि सेवाभावी संस्थेमार्फत 1 अशा 4 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये मोठी जनावरे 1 हजार 418 तर लहान 322 अशी 1 हजार 740 जनावरे आहेत. आणखी चारा छावण्यांची गरज असल्यास चारा छावण्या सुरु करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

English Summary: Considering the number of livestock, increased fodder camp
Published on: 14 May 2019, 07:47 IST