News

यावर्षी मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 34 टक्केच पाऊस पडला असुन सर्वदुर सारखा झालेला नाही, त्यामुळे पिक परिस्थिती समाधानकारक नाही. काही ठिकाणी अजुन पेरण्या बाकी असुन पावसाचा दीड महिन्याचा कालावधी जवळपास होत आला आहे.

Updated on 19 July, 2019 3:43 PM IST


यावर्षी मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 34 टक्केच पाऊस पडला असुन सर्वदुर सारखा झालेला नाही, त्यामुळे पिक 
परिस्थिती समाधानकारक नाही. काही ठिकाणी अजुन पेरण्या बाकी असुन पावसाचा दीड महिन्याचा कालावधी जवळपास होत आला आहे. अशा परिस्थितीत पर्यायी पिके व पिकपध्दती आपत्कालीन पिक नियोजनात समाविष्ठ करुन पेरणी करणे सोईस्कर होईल, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. यु. एन. आळसे यांनी दिला आहे.

पिकांची पेरणी योग्य पावसानुसार करावी. 16 ते 11 जुलै दरम्यान सुर्यफुल, बाजरी, सोयबीन + तूर, बाजरी + तूर, एरंडी, कारळ, तीळ, हुलगा, मटकी आदी पिकांची पेरणी करावी. कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी, यात तूर (बीडीएन-711), सोयबीन (एमएयुएस-71, जेएस-9305), बाजरी (एबीपीसी-4-3, धनशक्ती), सुर्यफुल (एलएस-11, 35) वाणांचा वापर करावा.

तसेच 1 ते 15 ऑगस्ट दरम्‍यान बाजरी, सुर्यफूल, एरंडी, तीळ, एरंडी अधिक धने, एरंडी+तुर आदी पिकांची पेरणी करावी. तर 16 ते 31 ऑगस्ट दरम्‍यान बाजरी, सुर्यफुल, एरंडी, तीळ, एरंडी + तुर, एरंडी + धने आदींची लागवड करावी.

मुलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, अशा ठिकाणी अरुंद ओळीच्या खरीप सर्वच पिकांमध्ये 3-4 ओळी नंतर एक सरी काढावी व कापुस व तुर रुंद ओळीतील पिकांमध्ये एक तास आड करुन सरी काढावी जेणेकरुन पडलेला पाऊस सरीमध्ये साठून पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडेल, असा सल्‍ला त्‍यांनी दिला आहे.

English Summary: Conduct emergency crop plan in low rainfall conditions
Published on: 17 July 2019, 03:41 IST