टेंभू योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश केला असल्याचे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण करून सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील 4 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. शेतकऱ्यांनी ठिबकव्दारे सिंचन करून उत्पादनात वाढ करावी व कारखानदारी उभारावी.
राज्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत 108 प्रकल्प, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत २८ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सांगली, सोलापूर जिल्ह्यासाठी 3 हजार 500 कोटींची मान्यता दिली आहे. यामध्ये 25 टक्के निधी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत व 75 टक्के निधी नाबार्डकडून दिला जाईल. या योजनांना केंद्राकडून तात्काळ निधी उपलब्ध करून देवून, या योजना येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ताकारी टेंभूसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार आणि केंद्र शासनाचे सहकार्य यातून हे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील व दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील, असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्र व गुजरात राज्यांत नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले आहे. दमणगंगा पिंजर धरण बांधून पाणी गोदावरीत सोडून राज्याच्या काही जिल्ह्यांमधील शेती सिंचनाखाली आणली जाईल. याबरोबरच कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी विशेष प्रकल्प राबविला जाईल. मराठवाड्यातील धरणे बांधून दुष्काळी भागाला पाणी देणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तासाठी भरीव काम करून दुष्काळग्रस्तांना नवीन जीवन देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यापुढे शेतकऱ्यांनी ऊस पीक तसेच, साखर निर्मितीला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यावा, असे आवाहन करून श्री. गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब आणि बेदाण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा निर्माण व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यात ड्राय पोर्ट निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी लागणारा 800 ते 1000 कोटी रूपयांचा निधी जेएनपीटीच्या माध्यमातून दिला जाईल. राज्य शासनाने यासाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून द्यावी,असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम आणि अतुलकुमार यांनी स्वागत केले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविकात राज्य व केंद्र शासनाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी राबवलेल्या योजना व दिलेल्या निधीचा उहापोह केला. सूत्रसंचालन विजय कडणे, श्वेता हुल्ले यांनी केले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: 25 December 2018, 08:20 IST