यावर्षी जून व जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे व शेतजमिनींचे खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून (दि. 3) रोजी १ हजार ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . १४ लाख ९ हजार ३१८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात येणार असुन शेतकऱ्यांना ही मदत डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकन्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात हा निधी देण्यात येत आहे.
यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार २४ तासात ६५ मि.मी.पेक्षा जास्त नोंद झालेली असेल आणि त्यामुळे गावामध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झाल्यास ही मदत देण्यात येणार आहे. तसेच ही मदत देताना केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्तीकरिता ठरवलेल्या अटी व शर्तीची पूर्तता केली जाणार आहे.
Published on: 09 October 2023, 02:00 IST