Sugarcane Farmers: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदारांकडून वजन काट्यावर फसवणूक केली जात आहे. असा आरोप बऱ्याच दिवसांपासून केला जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी वजन काट्यावर मोजून साखर कारखान्याला देण्यासाठी आणलेला ऊस स्वीकारणे साखर कारखान्यांवर बंधनकारक आहे. असा ऊस कोणताही कारखान्याला नाकारता येणार नाही, असे पत्र राज्याच्या वैध मापन विभागाने साखर आयुक्तालयाला पाठविले आहे.
या पत्राच्या आधारे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) हे याबाबत सर्व साखर कारखान्यांना तसा आदेश देणार आहेत. यामुळे आता उसाच्या मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना यापुढे चाप बसणार आहे.
हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, भविष्य निर्वाह निधीबाबत नवीन अपडेट जारी, नियम बदलले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर आयुक्तालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उसाचे वजन मोजताना होणारी काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
यावेळी साखर आयुक्त गायकवाड यांनी याबाबात वैधमापन विभागाला प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाच्या आधारे वैधमापन विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्तालयाला पत्राद्वारे हा निर्वाळा दिला असल्याचे शेखर गायकवाड यांनी सोमवारी (ता.७) मोर्चेकरी शेतकऱ्यांना सांगितले.
हेही वाचा: जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर करा या पिकाची शेती; तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल
राज्यातील सहकारी व खासगी कारखान्यांचे वजन काटे तपासण्याची मोहीम साखर आयुक्तालयाच्यावतीने हाती घेतली जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके अचानकपणे साखर कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या वजन काट्याची तपासणी करेल. यामुळे उसाच्या वजनात शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबणार असल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
Published on: 08 November 2022, 10:34 IST