आपल्या शेतीप्रधान देशातील कृषी विद्यापीठांनी परिस्थितीला साजेशे तंत्रज्ञान विकसित करीत अन्नधान्य उत्पादनात संपन्नता आणली व कृषि विभागाचे सहयोगाने व्यावसायिक शेतीचे तंत्रज्ञान गाव खेड्यापर्यंत पोहोचवित शाश्वत शेतीकडे वाटचाल सोपी केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार यांनी केले."माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" महत्त्वकांक्षी
आणि अभिनव अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आज अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात कुलगुरू, संचालक,अधिष्ठाता, शास्त्रज्ञ व अधिकारी कर्मचारी वर्गासोबत आढावा बैठक घेत विद्यापीठाच्या उपलब्ध कार्यप्रणाली समस्या जाणून घेतल्या व भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली त्याप्रसंगी
उपस्थितांना संबोधन करताना ते बोलत होते. आपल्या अतिशय अनुभवी आणि वास्तविक मार्गदर्शनात ना.सत्तार यांनी बदलती शेती पद्धती आणि कृषी विद्यापीठांची भूमिका याविषयी आपल्या संकल्पना अधिक विस्तारित केल्या.Expanded our concepts about the role of agricultural universities. राज्य तथा केंद्र शासनाचे संपूर्ण सहयोगातून कृषी विद्यापीठे व कृषी विभाग यांचे समन्वयातून भविष्यातील व्यावसायिक शेती साकारण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी याप्रसंगी केले. दरम्यान
शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी या तत्त्वावर काम करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गत काळात केलेल्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कार्यातील प्रगतीचा संपूर्ण लेखाजोखा कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी आपल्या सादरीकरणादरम्यान केला. याप्रसंगी विद्यापीठातील मजुरांचा आणि एकंदरीतच मनुष्यबळाचा, संशोधनात्मक तथा इतर प्रशासकीय बाबींसाठी मदतीचा आणि विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांचा
उहापोह कुलगुरू डॉ. भाले यांनी याप्रसंगी केला. आढावा बैठकीपूर्वी ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी विद्यापीठ शहिदांच्या स्मारकाला भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.विद्यापीठाद्वारे विकसित पिक वाण व तंत्रज्ञान यांच्या प्रदर्शनीचे अवलोकन करीत संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन सुद्धा मंत्री महोदयांनी केले. बैठकीचे सुरुवातीलाच विद्यापीठ प्रशासनाचे वतीने त्यांचा सत्कार माननीय कुलगुरू महोदयांचे शुभहस्ते करण्यात आला. कुलगुरू पदाचा
कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करीत विद्यापीठाला सन्मानजनक स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल मा. कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा सत्कार केला. आढावा बैठकीचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले. या बैठकीसाठी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा विधान परिषद सदस्य मा.आ. विप्लव बाजोरिया, डॉ. अर्चना
बारब्दे, श्री विठ्ठल पाटील सरप, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ.विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ.धनराज उंदीरवाडे,अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने,अधिष्ठता कृषी अभियांत्रिकी डॉ.सुधीर वडतकर,सर्व सहयोगि अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,विभागप्रमुख,विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रक्षेत्र प्रमुख,अधिकारी- कर्मचारी यांचेसह प्रसार माध्यम प्रतिनिधीची लक्षणीय उपस्थिती होती.
Published on: 02 September 2022, 09:51 IST