गायीचे डोहाळे जेवण असं फक्त आपण बोललो तर आपल्याला वेड्यात काढतील, मात्र हे खरे आहे. यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे. यामध्ये हारुगडे कुटुंबीय हे अध्यात्मिक असल्याने सुरुवातीला भजनही ठेवण्यात आले होते. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे. अनेकांच्या दारात एक साधी गाई तरी असतेच असते. मात्र काहीजण अगदी घरच्यांप्रमाणे तिची काळजी घेतात.
झाले असे की, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा महाशिवरात्रीनिमित्त रंगलेला होता. गावात वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे. गावातील माजी सरपंच भगवान हारुगडे यांच्या कुटुंबियांनी गायीचेच डोहाळे जेवण घातले आहे. सर्वकाही विधीवत करुन आख्ख्या गावाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या निमित्त विविध कार्यक्रम हे हारगुडे यांच्या घरी पार पडले. यामुळे ते चर्चेत आले आहेत.
यावेळी हारुगडे कुटुंबीय हे अध्यात्मिक असल्याने भजनही ठेवण्यात आले होते. यावेळी अनेकांनी उपस्थिती दाखवली. तसेच सर्व विधी करत गायीचे नामकरण देखील संपन्न झाले. यावेळी गाईचे नावदेखील लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे. सकाळी गायीची पूजा करुन तिला फुलांनी सजवण्यात आले होते. महिलांकडून पूजा केली जात होती. तेथेच भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. सुशांत हारुगडे यांच्या आजीची खूप इच्छा होती की घरात एक देशी गाय असावी, यासाठी त्याने मिञाकडून ती गायी आणली व तिला जीवापाड प्रेम केले. तिची काळजी अगदी घरच्या व्यक्तीसारखी घेतली गेली.
यावेळी संस्कृतीचे जतन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे हारुगडे कुटुंबियांनी सांगितले आहे. यावेळी गावातील व्यक्ती जेवणासाठी उपस्थित होते, यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. डोहाळे जेवण हे गायीचे असले तरी सर्व गाव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामुळे हा एक आता चर्चेचा विषय बनला आहे. यासाठी गावातील अनेक महिला व अबालवृद्धांनी गर्दी केली होती. अगदी महिलांचा जसा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो तसा संपूर्ण साज याठिकाणी करण्यात आला होता.
Published on: 02 March 2022, 05:07 IST