तब्बल पंधरा वर्षानंतर परभणीचे निच्चांक तापमान 3 अंश सेल्सिअस
मराठवाडयातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हयात सध्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सध्या विदर्भामध्ये थंडीची लाट आलेली असुन पश्चिम विदर्भालगतचे जे तीन जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्हयात थंडीच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे. तसेच दिवसाचे कमाल तापमानात देखील घट झाली असल्यामुळे वातावरणात गारवा अधिक जाणवत आहे आणि दिवसा सुर्याची उष्णता जमिनीत शोषन होते व रात्रीला ही जमिनीत शोषण केलेली उष्णता आकाशाकडे परत परावर्तीत होते.
सध्या ढगाळ वातावरण नसल्यामुळे आणि वारा शांत किंवा स्तब्ध असल्यामुळे सुर्याची उष्णताही सरळ आकाशाकडे निघून जात आहे. जर ढगाळ वातावरण राहीले असते तर ती उष्णता परावर्तीत होऊन वातावरणातील किमान तापमानात वाढ झाली असती. परंतु तसे होत नसल्यामुळे किमान तापमानात घट होत आहे. यापूर्वी 17 जानेवारी 2003 रोजी आतापर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान 2.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. दिनांक 29 डिसेंबर रोजी 15 वर्षानंतर परभणीचे किमान तापमान हे ३ अंश सेल्सिअस पर्यंत आलेले आहे आणि आगामी 3 ते 4 दिवस असाच वातावरणात गारवा राहील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.
Published on: 30 December 2018, 08:55 IST