गेली काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अशातच रंकापासून रावाला दिलासा देणारा लिंबाचा आणि उसाचा रस महाग झाला आहे. कुठेही सावलीला थांबून कधी एकट्याने तर कधी कुटुंबाला घेऊन सामान्य नागरिक लिंबू पाणी आणि उसाचा रस घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लिंबाचा आणि उसाचा रस १५ ते २० रुपये ग्लास झाला आहे.
अनेक ठिकाणी उसाच्या रसात लिंबू, आले आणि अननसचे मिश्रण वापरून त्यांची लज्जत वाढवण्यात येते. परंतु डिझेल व लिंबू दरवाढीमुळे लिंबू पाण्यासह उसाच्या रसाचा ग्लास दहावरून पंधरा ते वीस रुपयांपर्यंत वाढला आहे. जानेवारी महिन्यापासूनच थंड पेय पिण्यावर नागरिक भर देतात. मात्र सध्या रसवंतीगृहांतील उसाच्या ग्लास आकारामध्ये व दरामध्येही तफावत पहायला मिळत आहे. तर काही विक्रेत्यांनी लिंबाचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे.
स्वतःच्या शेतातील ऊस असणारे १५ रुपये ग्लास तर ऊस विकत घेऊन रसवंती चालवणारे रस विक्रेते २० रुपये ग्लास रस देत आहेत. रसात लिंबू टाकण्याची मागणी केल्यास लिंबू संपले असल्याचा निर्वाळा दिला जात आहे. रसवंतीगृहचालकांना काही शेतकरी प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये या दराने उसाची विक्री करीत आहेत.
पाच हजार रुपये या दराने उसाचे क्षेत्र विकत आहेत. या वाढत्या उष्म्यात लिंबाच्या दराने उसळी घेतली असून, तीनशे रुपये प्रतिशेकडा लिंबू विक्री होत आहे. तर अनेक रसाची गुऱ्हाळे डिझेल पंपावर चालत आहेत. त्यामुळे डिझेल दराने प्रतिलिटर पार केलेली शंभरी या दरवाढीला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळपास चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक रसाच्या माध्यमातून गारवा निर्माण करू पहात असल्याने रसवंती गृहावर लोक गर्दी करतात. परंतू आता लिंबाच्या महागाईने गरिबांचे कोल्डड्रिंक महाग झाल्याचे दिसत आहे. सध्या सर्वच वस्तूंमध्ये महागाई वाढल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
राज्यात लोडशेडिंगवरून सरकारचे पितळ उघडे, विरोधकांनी धक्कादायक माहिती आणली समोर..
आता ना गावठी ना देशी, आता फुलांपासून थेट विदेशी, राज्य सरकारचा निर्णय..
लोडशेडिंगबाबत अजित पवारांची मोठी घोषणा! लोडशेडिंगवर तोडगा निघण्याची शक्यता...
Published on: 22 April 2022, 05:41 IST