News

Eknath Shinde : मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात.

Updated on 25 January, 2024 11:46 AM IST

Satara News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा येथिल दरे गावातील शेतीत रमल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या शेतातील हळद काढणी केली आहे. तसंच ट्रॅक्टर देखील त्यांनी चालवला असून संपूर्ण शेताला फेरफटका त्यांनी मारला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे मुख्यमंत्री शिंदे यात्रेनिमित्त आले असून ते काही वेळ आपल्या शेतात रमल्याचं पाहायला मिळालं आहे. शिंदेंच्या शेतात सध्या औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा , सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव , शेती, गावाकडची माणसे यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला, तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल, आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

पुढे शिंदे म्हणाले की, आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असे सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत असून जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबूबरोबरच रेशीम, सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कादांटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्ग संपन्न आहे. या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर यासारखी विविध पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

English Summary: Cm Eknath Shinde Chief Minister Shinde indulged in agriculture again Check out the photos
Published on: 25 January 2024, 11:46 IST