मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ढगाळ वातावरणाची स्थती कमी झाली आहे. मात्र कोकणात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे. दरम्यान आज आणि उद्या कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या मध्य महाराष्ट्र व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती काही प्रमाणात आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेशाच्या आग्नेय भाग व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे अरबी समुद्राकडील बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्याने कोकणातील काही भागात अंशत: ढगाळ वातावरण आहे. मात्र मराठवाडा व विदर्भात कोरडे वातावरण असल्याने उकाडा वाढला आहे.
यामुळे मागील चार ते पाच दिवस कमी झालेला कमाल व किमान तापमानाचा पारा पुन्हा काही प्रमाणात वाढला आहे. गुरुवारी सकाळी २४ तासात रत्नागिरी येथे ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेल्याचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे. गेले काही दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत अजूनही गारवा आहे.त्यामुळे किमान तापमानात घट असली तरी दिवसभर पडलेल्या काहीशा उन्हामुळे कमाल तापमानाचा पारा बऱयापैकी वाढला आहे. कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.
या भागात कमाल तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात चढ- उतार असून २८ ते ३८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३४ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे.
Published on: 26 March 2021, 12:23 IST