परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि परभणी आत्मा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा प्रशिक्षकांचे पाच दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर प्रशिक्षणाची सांगता दिनांक 4 मे रोजी झाली. सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख हे होते, तर परभणी आत्माचे उप-प्रकल्प संचालक श्री. के. आर. सराफ, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना के. आर. सराफ यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मा यांच्याकडून मिळालेले तांत्रिक माहितीचा उपयोग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवितांना करण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रशांत देशमुख म्हणाले की, प्रक्षेत्रावर कार्य करतांना येणाऱ्या अडचणी समर्थपणे पेलण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा व आपले कौशल्य वृध्दींगत करावे तर डॉ. यु. एन. आळसे यांनी शेतीशाळा प्रशिक्षकांनी प्रक्षेत्रावर कामकरतांना गरजेवर आधारीत ज्ञानाचा प्रसार करण्याचा सल्ला दिला.
यावेळी प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले तर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतीमध्ये यांत्रीकीकरण, मुख्य पिकांवरील किडी व रोग ओळखणे, त्यावरील उपाय, हवामान बदलानुसार होणारे रोगांचे व किडी प्रमाण हवामान बदलाशी निगडीत विविध शेती तंत्रज्ञान, तसेच लोकव्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सुविधा संभाषण कौशल्य, मौखीक सादरीकरण कौशल्य आदीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
Published on: 07 May 2019, 07:33 IST