रबी हंगामात गडचिरोली जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव, देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली आहे. मात्र रोवणी झालेल्या धानावर वातावरणाचा परिणाम झाला असून कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. खरीप हंगामातील धानपीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धुमाकाळ घातला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. दरम्यान सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पैशांची जुळवणी करुन उन्हाळी धानपिकांसाठी पेरणी केली. आता उन्हाळी धानाच्या रोवणीचे काम संपले असून धान हिरवेगार दिसत आहे.
पण गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरेगाव आणि चोप परिसरात कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. २० ते २५ दिवस रोवणी झालेल्या धान पिकांवर दोनवेळा फवारणी करुनही कडाकरपा रोग आटोक्यात येताना दिसत नाही. दरम्यान काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी हंगामात धानपिकांची शेती केली. मात्र आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील १५.७५ लाख हेक्टर क्षेत्र हे भाताखाली असून २९.९६ लाख टन इतके भाताचे उत्पादन राज्यात होते.
Published on: 17 March 2020, 12:15 IST