देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते, राज्यात देखील मिरचीचे क्षेत्र लक्षणीय नजरेस पडते. राज्यात खानदेश प्रांतात नंदुरबारमध्ये मिरचीसाठी राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मिरचीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. देशात गुंतुर बाजार पेठ मिरचीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या चालू हंगामात राज्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत मिरचीची विक्रमी आवक नजरेस पडली.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, केवळ याच हंगामात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड लाख क्विंटल एवढे विक्रमी मिरचीची आवक झाली आहे. मिरचीची आवकमध्ये अजूनही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, बाजारपेठेतील प्रमुख व्यापाऱ्यांच्या मते या हंगामात तीन लाख क्विंटल एवढी विक्रमी आवक होण्याची शक्यता आहे. नंदुरबार बाजारपेठेत अवघ्या अडीच महिन्यात विक्रमी दीड लाख क्विंटल मिरचीची खरेदी केली गेली आहे. यामुळे या हंगामात आतापर्यंत तब्बल 35 कोटींची उलाढाल झाल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत बनलेल्या समीकरणामुळे या हंगामात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी तेजी नजरेस पडत आहे. नंदुरबार बाजार पेठेत या हंगामात मिरचीच्या दरांनी मोठी मुसंडी मारली आहे, विक्रमी दर प्राप्त होत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या उत्साहात असल्याचे चित्र आहे.
मिरची उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात मिरची पिकातून चांगले उत्पन्न प्राप्त होण्याची आशा आहे. आणि बाजारपेठेतले सध्याचे चित्र शेतकऱ्यांच्या या आशांना पल्लवित करण्याचे कार्य करत आहे. या आठवड्यात बाजारपेठेत मिरचीचा दर यात आणखी तेजी आली आहे आणि आता बाजारपेठेत मिरचीचे दर 2 हजार 500 प्रति क्विंटल ते 4000 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान कायम असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. बाजारपेठेत चालू हंगामात लाली, व्हीएनआर, जरेल, फाफडा आणि शंकेश्वरी या जातीच्या मिरचीची मोठी मागणी असल्याचे समजत आहे. या हंगामात मिरचीला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी विशेष प्रसन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची काढणी सुरू आहे तसेच मिरचीच्या बाजार भावात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने मिरची उत्पादक शेतकर्यांचा आनंद गगनात मावत नाहीये.
नंदुरबार बाजार पेठमध्ये मिरचीच्या वाहनांच्या रांगाच रांगा नजरेस पडत आहेत. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आवक जास्त असल्याने उशिरापर्यंत मिरची खरेदी देखील करावी लागत आहे. असे असले तरी, मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकावर देखील विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे मिरचीच्या उत्पादनात घट देखील झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडेमिळत असलेल्या बाजार भावासाठी मिरची उत्पादक शेतकरी आनंदी आहे तर दुसरीकडे उत्पादनात घट असल्यामुळे मनात खंत देखील आहे.
Published on: 22 January 2022, 09:52 IST