महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या आवकेत घट झाली आहे.
यामुळे यंदाही गडहिंग्लज जवारी (संकेश्वरी ) मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्किंटलला किमान ८० हजार ते १५०००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. याशिवाय इतर जातीच्या मिरचीच्या दरातही किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.
संकेश्वरी मिरचीची गडहिंग्लज व कर्नाटकातील संकेश्वर चिकोडी भागात लागवड केली जाते. यंदा पीकवाढीच्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. यामुळे मिरचीचे व्यवस्थापन करणे अशक्य बनले. यामुळे शेतकऱ्यांना जेवढे अपेक्षित उत्पन्न होते तेवढे मिळाले नाही. मागणी कायम असल्याने शेजारील बाजारपेठांमध्ये या मिरचीचे दरचढेच राहिले. हंगामाच्या सुरुवातीला ६० हजार रुपयांपासून सुरू झालेले दर हंगाम संपतेवेळी १,५०,००० रुपयांपर्यंत गेले आहेत.
गेल्या वर्षीही १८०००० रुपयांपर्यंत दर मिळाला होता.यंदा दर चांगला मिळाला असला तरी उत्पादनात घट आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सध्या पश्चिम महाराष्ट्रात जवारीबरोबर ब्याडगी, गुंटूर, लवंगी, मिरचीलाही मागणी असते. ब्याडगीचे उत्पादन रायचूर, हुबळी भागात होते. तर गुंटूर, लवंग मिरचीची मध्य प्रदेश, आंध्रप्रदेशमध्ये लागवड होते.
सध्या अणेगिरी, ब्याडगीस क्किंटलला २९००० ते ३१००० ,गुंटूर मिरची क्किंटलला १२५०० ते १५००० , लवंगी मिरचीच १७००० ते १८००० रुपये दर मिळत आहे.
Published on: 04 April 2021, 10:07 IST