मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे येत्या 12 डिसेंबरपासून 'चेतक महोत्सव' सुरु होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना या भागात आकर्षित करुन उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
येत्या बुधवारी (12 डिसेंबर) मंत्री श्री. रावल आणि पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. चेतक महोत्सव समिती आणि एमटीडीसी यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घोड्यांच्या बाजारासोबत शस्त्रास्त्र प्रदर्शन, घोड्यांच्या स्पर्धा, पेंटींग स्पर्धा, फोटो प्रदर्शन, घोडेस्वारी, टेंट सिटी, लावणी महोत्सव, कव्वाली महोत्सव यासारखे अनेक कार्यक्रम होणार आहेत. 8 जानेवारी 2019 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी केले आहे.
सारंगखेड्याच्या पारंपरिक घोडे बाजाराला अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी ‘चेतक महोत्सव’ सुरु करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात देशभरातील विविध प्रजातीचे 3 हजारहून अधिक घोडे सहभागी होणार आहेत. सारंगखेड्याच्या दत्त मंदिराच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. आता त्यास चेतक महोत्सवाची जोड मिळाल्याने देश-विदेशातील लाखो पर्यटक सहभागी होतील, असा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.
यानिमित्ताने घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अश्व पोस्टर स्पर्धेत आतापर्यंत 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून या पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे. महोत्सवात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी घोड्यांची चाल, सौंदर्य, शक्ती, वेग व नृत्य या स्पर्धासोबत अँडव्हेंचर स्पोर्ट, वॉटर स्पोर्ट, सायकलिंग, हॉर्स डान्स, हॉर्स शो यासोबतच भजनसंध्या, कबड्डी स्पर्धा, पालखी सोहळा, लावणी महोत्सव, हास्य कवी संमेलन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण:
- देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी खास पहाडी घोडेस्वारीची संधी
- निवासासाठी लक्झरी टेंटसह डॉर्मिटरीचीही व्यवस्था
- दोन विशेष कॅमेरे करणार हेड काऊंट, त्यामुळे यात्रेला येणाऱ्या पर्यटकांची नेमकी संख्या मोजता येणार
- हॉर्स लव्हर्स, क्लब्ज, ब्रिडर्स यांचा डेटा बेस, त्यामुळे जातिवंत अश्वांची पारख करण्यास मदत
- स्थानिक महिलांसाठी उद्योजकता कार्यशाळा
- स्थानिक कलाकारांसाठी मुक्त कला मंच
- स्थानिक अन्नपदार्थांचे फूड कोर्ट
- पुरातन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
Published on: 11 December 2018, 07:36 IST