पुणे
बंगालच्या उपसागरात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (दि.२५) रोजी कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण, घाटमाथ्यावर तडाखा सुरूच असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता.२५) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. विदर्भासह मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
सध्या राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. तर मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये ४४.६ मिमी पाऊस बरसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिली आहे. आजही मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबई अंशतः ढगाळ वातावरण सुरु असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Published on: 25 July 2023, 10:31 IST