राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने हवेत गारवा तयार झाला आहे, याविषयीचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान आहे. मुंबई, ठाणे, घाटमाथा, पुणे, सातारा, नाशिक, नगर, धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या.
अरबी समुद्राच्या पश्चिम भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी व मध्यप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. त्यातच या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन बाष्प कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश या दिशेने सरकले होते. दरम्यान पुन्हा बंगाल्चा उपसागरात आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी भागातही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील १० ते १५ दिवस थंडीत चढउतार राहणार असून किमान तापमान कमी अधिक होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र झालेल्या पावसामुळे आणि जमिनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही भागात हवेत काहीसा गारठा वाढला आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे १७.० अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. मात्र ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यात ऊन आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. या भागात १८ ते २० अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात १७ ते १९, कोकणात २१ ते २३ अंश सेल्सअस दरम्यान किमान तापमान होते. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. ढगाळ वातारवरण तयार झाले आहे. तापमानाचा पारा १८ अंशावर असतानाही थंडी कमी झालेली नव्हती. सोमवारी सकाळीपासून ढगाळ वातावरण आहे.
Published on: 15 December 2020, 10:32 IST