गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या स्थितीमुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वाऱ्यासह पावासाचा जोर वाढणार आहे. मात्र मराठावाड्यात जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून ही स्थिती आज आणि उद्या दिवसभर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भात आणि मराठावाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातही मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी दिवसभर सुरूअसलेली पावसाची रिपरिप गुरुवारी सकाळपर्यंत सुरूच होती. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत मुंबई परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार (६५ ते ११५ मिमी) पावसाची नोंद झाली. मात्र दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला.
बंगाल उपसागराच्या पश्चिम मध्य भाग ते बिहार उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून तो झारखंड, पश्चिम बंगाल आणि बंगाल उपसागराचा वायव्य भागापर्यंत आहे. समुद्रसपाटीपासून हा पट्टा ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. यासह पश्चिम बंगालच्या पश्चिम मध्य भाग व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ओडिशा, आंध्रप्रदेश, या भागापर्यंत असून बंगालच्या उपसागराच्या वायव्य भाग ते ओडिशाच्या पश्चिम भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा फिरोजपूर, कर्नाल, ग्वालियर, सातना, अंबिकापूर, छईबासा ते बंगाल उपसागराच्या वायव्य भागापर्यंत व ओडिशाचा उत्तर भाग आणि पश्चिम बंगाल या दरम्यान आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चांगल्या पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे.
Published on: 14 August 2020, 08:34 IST