राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. यासह राज्यातील काही भागात उन्हाचा चटकाही वाढला असून ४४ अंशांच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भाततील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उद्यापासून राज्यात उष्ण व दमट हवामानाच अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील २४ तासात पुर्वेकडील भारतातील काही भागात पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात मध्यम प्रतीच्या पाऊस होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, लदाख आणि उत्तरी पंजाबमधील काही भागातही हलका प्रतीचा पाऊस होण्याची शक्यता. मध्यप्रदेशापासून विदर्भ, तेलंगाणा, रायलसिमा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बिहार आणि लगतच्या झारखंडमध्ये चक्रवाती वादळाचे क्षेत्र बनले आहे. या प्रणालीपासून उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेशपर्यंत एक चक्रीवादळ पसरत आहे. तेथून कर्नाटकमधून दक्षिणेकडील तामिळनाडूपर्यंत पट्टा तयार झाला आहे. आता महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागातही चक्रीय वाऱ्याचा पट्टा तयार झाला आहे.
दरम्यान आज कोकणातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, आणि विदर्भातील, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.
दरम्यान राज्याच्या विविध भागात उन्हाचा चटका वाढला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील, अकोल्यासह वाशीम येथे तापमान ४३ अंशापुढे गेले आहे. मागील २४ तासात भारतातील काही राज्यात दमदार पाऊस झाला आहे. किनारपट्टीय प्रदेश ओडिशा, आंध्रप्रदेशात हलक्या प्रतीचा पाऊस झाला. मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगालमध्येही हलक्या प्रतीचा पाऊस झाला आहे. काल पुण्यातही वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला आहे.
Published on: 02 May 2020, 11:36 IST