News

पावसासाठी अनुकूलता तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Updated on 29 July, 2020 5:27 AM IST


पावसासाठी अनुकूलता तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्चिमी चक्रावाताची स्थिती त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली. मॉन्सूनचा आस दोन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता असल्याने राज्यात पाऊस पुन्हा सुरू होणार आहे.

पुढील दोन दिवसांत मुंबईत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.  तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पुढील पाचही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  विदर्भात काही ठिकाणी दोन दिवस मुसळधार पाऊस होईल, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.   तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.  उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

मंगळवारी मुंबई वगळता राज्यात अन्यत्र पावसाने दडीच मारली.   मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कायम राहीला.  पश्चिम उपनगर, ठाणे आणि डोंबिवली येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.  कुलाबा येथील हवामान विभागाच्या केंद्रावर ८३.६ मिमी, तर पश्चिम उपनगरात अंधेरी, मालाड, बोरिवली, दहीसर आणि भाईंदर येथे ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. सांताक्रूझ केंद्रावर ७.७ मिमी पाऊस झाला.

English Summary: Chance of rain in different parts of the state
Published on: 29 July 2020, 05:26 IST